देवा, कसा आहेस रे?

आईशप्पत सटकलो असतो, पायरीच चुकली.. आता 7 महिन्यानंतर येतोय म्हणल्यावर तेवढं होणारच की. रेलिंगला धरून चालावं लागणार वाटतं. भलेही सात महिन्यानंतर येतोय, पण तो सुगंध, तो फ्रेशनेस, ते पावित्र्य आज ही तसच आहे. दारातला मोगरा खूप छान फुललाय, वास मस्त येतोय. तुळस पण मस्त बहरलीये. दाराचा उंबरा आत्ताच धुतलाय आणि त्याला कुंकू लावलंय वाटतं. लाल कुंकवावर पांढरा टपोरा मोगरा काय खुलून दिसतोय. इतक्या दिवसाने पाहतोय, इतकं मस्त वाटतंय ना.. त्या उंबऱ्याला हात लावून ती धूळ माथी लावणे ही गोष्ट शिकवावी नाही लागत, आणि नेहमीप्रमाणे मी शीर झुकवून आत आलोय बघ. 

देवा.. कसा आहेस रे, हसतोयस होय रे माझ्याकडे बघून. खूप दिवसांनी बघतोय रे. गोड दिसतोयस पण खरंच. खराब का झालायस रे एवढा? काळजी घेत नव्हतास का रे? अरे तूच असं करून कसं चालेल बाबा! एवढं जग चालवतोयस, रहाटगाडा बघतोयस थोडं स्वतःकडे पण लक्ष दे. बाबा, तुला घाबरतात रे सगळे, त्यांची गाऱ्हाणी सांगतात, तक्रारी करतात पण तुझ्यावर प्रेम करणारी खूप कमी आहेत रे. त्यांचं तरी ऐक बाबा. असुदे, चल बाकी काय म्हणतोयस.. अरे काय रे मुंग्या लागल्या की प्रसादाच्या गुळाला, कसा रे तू असा? कोण नाही म्हणलं आपण पण करायचं नाही का? थांब मी काढतो. खूप दिवसानंतर वेगळा कोणीतरी माणूस तुझ्या गाभाऱ्यात येतोय, तुला पण वेगळं वाटत असेल ना? ठाऊक आहे रे.. रोज लाखो भक्तांना तुझं दर्शन घडवतोस, आणि तुला पण रोज त्या लाखो भक्तांना बघायची पण सवय झाली होतीच गेली कित्येक वर्ष! तुझं आणि माणसांचं म्हणजे, तुला त्याच्या शिवाय जमत नाही आणि त्यांना तुझ्या शिवाय. एक शब्दही न बोलता, जागेवरून न हलता किती माया करतोस रे सगळ्यांवर. उगीच तुला आई म्हणत नाहीत रे. 7 महिने आम्हाला कोंडलस आणि स्वतःला पण त्रास करून घेतलास. कारण आमच्याशिवाय राहणं कधी तुला जमलंच नाही. पण तू ना, देवा खूप हट्टी आहेस, तुझ्याकडे कोणी येईना म्हणून उठलास आणि आमच्यातच आलास होय रे! 

आं, दचकू नकोस, मी पाहिलं होतं तुला. भर उकड्यात PPE किट घालून, प्रत्येकाच्या जवळजाऊन उपचार केलेस की, भर उन्हात हातात काठी घेऊन वर्दीत उभा होतास की, sanitizer च्या टँकर वर बसून आख्या शहरातून स्प्रे करताना पाहिलं की तुला, आमच्यासाठी तुंबलेल्या नाल्यात उतरताना पाहिलं की तुला. सफाई कामगार झालास, रस्ते झाडलेस, हातानं घाण उचललीस. शिक्षक झालास, घरोघरी जाऊन आपुलकीनं विचारपूस केलीस. डॉक्टर होऊन प्रत्येकाच्या डोक्यावरून मायेने हाथ फिरवलास. शेतकरी झालास, सगळ्यांच्या पोटाची भ्रांत मिटवलीस. खूप केलंस रे.. 7 महिन्याच्या वर राबलास, खूप कष्ट केलेस. तिकडं सीमेवर सतत उभा असतोसच की, आणि आता आमच्यासाठी रस्त्यावर पण! 

युगे अठ्ठावीस उभा आहेस कधी कंटाळत नाहीस का?
अरे एवढा राबतोस पाय नाही दुखत का?
बोलत नसलास तरी कळतं रे सगळं, तुझी शांतताच खूप बोलते रे, पण ती ऐकायला कान लागतात. नाही कळत काही काहींना. देवा, यावर्षी एखादा वारकरी आला आणि पंढरीच्या सीमेवरून माघारी गेला. त्यावेळी वर्दीत असणाऱ्या तुला काय वाटलं असेल याची कल्पना येतीये मला. खूप सहनशील आहेस, खूप सेवाभावी आहेस, खूप कष्टाळू आहेस आणि म्हणून तू देव आहेस आणि आम्ही माणसे. देवा, आम्हीही असे असतो तर तुला खूप आराम मिळाला असता. आम्ही नुसते हाथ जोडून उभे राहतो, सगळं तू करतोस. आम्हाला जबाबदारीची जाणीव का नाहीये रे? आम्हाला पण तुझ्यासारखा स्वभाव असणारा माणूस व्हायचंय, आम्हालाही देवमाणूस व्हायचंय! प्रत्येकाने ही गोष्ट आपल्यापासून सुरवात केली तर तू पण थोडा स्वस्थ बसू शकशील. तुझं बोट धरून चालायचंय आम्हाला नीतिमत्तेच्या वाटेवर, तत्वांच्या वाटेवर, आदर्शाच्या वाटेवर. 

खूप वेळ झाला ना आपण गप्पा मारतोय, चल निघू का? बरेच दिवस मित्रासोबत दिलखुलास गप्पा मारल्या नव्हत्या म्हणून आलो होतो. बरं वाटलं खूप! आराम कर थोडा, नाहीतर पळत आहेसच सारखा. चल निघतो, काळजी घे आमची पण आणि स्वतःची पण. Love you दोस्ता.

- आदित्य मोरे

Comments

  1. मनाला हेलावून टाकणार संभाषण खरंच देवाची खरी प्रतिमा ही..!

    ReplyDelete
  2. खूप सुंदर ❤️ खरंच देवाला त्याचे हाल चाल विचारणे हे स्वार्थाच्या पलीकडे आहे ☺️

    ReplyDelete

Post a Comment