डोंबिवली से दादर जाने वाली...

मुंबई! तीन अक्षरी शब्दात सारासार विश्वाचं दर्शन घडवणारं महानगर. 'मुंबई कधी झोपत नाही' म्हणतात, अगदी खरंय. या बिचारीला स्वस्थ बसणं, शांत झोपणं कधी जमलंच नाही. सीमित क्षेत्रफळात प्रचंड लोकसंख्या सामावून घेतलेल्या या महानगरी ने अगणित लोकांना रोजगार दिला, घास खाऊ घातला. देशाची आर्थिक राजधानी असलेलं हे शहर, देशाच्या एकूण महसुलात सिंहाचा वाटा उचलतं म्हणून जर मुंबई थांबली तर देशाच्या अर्थचक्राचा वेग मंदावतो प्रसंगी थांबतो सुद्धा. वर वर पाहिलं तर कुणाला मुंबईतील प्रचंड गरिबी दिसेल, तर कुणाला कुबेराची श्रीमंती दिसेल. कुठे देशातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी दिसेल तर कुठे देशातील सगळ्यात मोठं financial hub दिसेल. पण सारासार विचार केला तर कफल्लकापासून अगदी धनाढ्यांपर्यंत सगळ्या वर्गातील माणसांना कवेत घेऊन, सगळ्याची पोटं भरणारी ही नगरी एवढी मोठी आर्थिक तफावत सहन करत तेवढ्याच वेगात धावते आहे. अथांग रत्नाकराच्या हातात हात घालून उभी असलेली मुंबई, तिच्यावर आजवर अनेक नैसर्गिक, मानवनिर्मित संकटं आली पण त्या दुःखावर मात करून पुन्हा पाय ठामपणे रोवून ती उभी राहते. मुंबईला भूतकाळ वगैरे मान्यच नाहीत. तिला फक्त आज आणि उद्या एवढंच कळतं म्हणून ती कुठेच जास्त काळ रमत नाही.
मुंबईतला मध्यमवर्गीय म्हणजे मुंबईची खरी ओळख. एवढ्या प्रचंड महानगरीत देखील प्रत्येक मुंबईकराचं त्याचं स्वतःचं वेगळं विश्व असतं. देशातल्या प्रत्येक कोपऱ्यातून चाकरमानी त्याची स्वप्न उराशी बाळगून मुंबईत पाय ठेवतो. अश्या चाकरमान्यांची कुटुंब मात्र गावीच असतात. कधीतरी आई, वडील, बायको, मुलं सगळे आठवतात पण या नगरीवर नितांत श्रद्धा असणाऱ्यांना मुंबई मायेचा ओलावा नेहमी देत असते. कष्ट आणि सातत्य यांचं मुर्तीमंत उदाहरण असणारी मुंबई प्रत्येक कष्टकरी लेकराला आईची माया नेहमी देते. पुलं म्हणतात, 'मुंबईकरांचे घड्याळ हे त्याच्या हाताला नाही तर त्याच्या नशिबाला बांधलेलं असते'. घड्याळाच्या काट्यावर चालणे हाच या नगरीचा मूळ धर्म आहे.

मुंबईकर चाकरमान्याला डांबरी रस्त्यापेक्षा लोखंडी रुळावर खूप जास्त विश्वास आहे. मुंबई लोकल हा अखंड उपन्यासाचा विषय आहे. तासाच्या पुढं असणारी मिनिटं देखील किती महत्त्वाची असतात हे लोकलने शिकवलंय. कुठल्या लाईन ची, किती नंबरची, लोकल कुठल्या प्लॅटफॉर्म वर येणार याची कल्पना त्याला अगोदरच असते. आणि त्या हिशोबाने तो एका विशिष्ट ठिकाणी उभा राहतो. सुरुवातीला प्लॅटफॉर्म वर त्या विशिष्ट ठिकाणी कोणीही उभं नसलं तरीपण तो मात्र आत्मविश्वासाने तिथे उभा असतो आणि लोकलचा इच्छित डबा तिथेच येऊन थांबतो. असा अंदाज लावून प्लॅटफॉर्म वरच्या आलम प्रवाश्यांची बोटं तोंडात घालायला लावणारी ही दैवी शक्ती त्याला रोजच्या प्रवासाच्या तपश्चर्येने प्राप्त झालेली आहे हे कोणीही सांगेल. लोकल रेल्वे च्या प्लॅटफॉर्म वर हाडाचा मुंबईकर आणि इतर नागरिक यांमधील फरक चटकन लक्षात येतो. रेल्वे पूर्ण थांबेपर्यंत त्या रेल्वेतील प्रवासी प्लॅटफॉर्म सोडून कधीच पुढे गेलेला असतो. रेल्वे थांबायच्या आधीच उतारू प्रवासी उतरून नवीन प्रवासी चढणे हा मुंबईकराचा एक अलिखित नियम असावा. आणि हे सगळं न धडपडता करणे यासाठी मुंबईकराचं निर्भीड काळीज असावं लागतं, ते ऐऱ्यागैऱ्याचं काम नव्हे. मुंबईकराला अचाट आत्मविश्वासासोबत जादुई नजर देखील असावी कारण गडबडीच्या वेळी प्रवाश्यांनी तुडुंब भरलेला डबासुद्धा त्याला संपुर्ण रिकामा दिसतो. आपल्याला त्या गर्दीत चढता येत नाही म्हणून आपण गर्दीला हिणवत असतो, तर आपल्या मागचा 'रिकामाच तर आहे' म्हणून आपल्या आधी वर चढतो. अश्या प्रसंगी स्वतःवर हसू ही येतं आणि ही कसरत रोज करणाऱ्या चाकरमान्यांचं कौतुक देखील वाटतं. मुंबईतल्या गर्दीचा त्रास मुंबईकराखेरीज इतरांनाच जास्त होत असतो. मुंबई ही कष्ट करणाऱ्यांचीच! बाकीच्यांचं इथं काम नाही हे आपल्याला कळून चुकतं. प्लॅटफॉर्मवर फक्त १० सेकंद थांबलेल्या लोकल मध्ये प्रवासी चढ उतार करतात आणि डब्यात आपली जागा स्थिर होते न होते तोवरच हिची चाकं पळायला लागतात.

लोकल ट्रेन हा सगळ्या मध्यमवर्गीय नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा विषय. नोकरीला जाणाऱ्या नोकरदार वर्गाने आपापल्या सोयीनुसार लोकलचं स्वतंत्र वेळापत्रक बनवलेलं असतं. म्हणजे या 'डोंबिवली वरून ६.१० ची त्यानंतर दादर वरून ७.०९ ची' हे त्याच्या डोक्यात पक्कं बसलेलं असतं आणि कित्येक वर्षे तो ठरलेल्या वेळेत त्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म झिजवत असतो. ही लोकल गेली तर पुढची कुठली, त्याच्या पुढची कुठली हे देखील त्याला मुखोद्गत असतं. एखाद्या दिवशी लोकल चुकली किंवा रद्द झाली तर त्याला जे काही विलक्षण दुःख होतं त्याची तुलना इतर कुठल्याही दुःखाशी होऊ शकत नाही. लोकलने देखील समाजव्यवस्थेसारखे स्वतःचे वर्ग पडून घेतले आहेत. म्हणजे उच्छभ्रू, मध्यमवर्ग आणि दारिद्र्यरेषेखाली तसेच First Class, Second Class, Ladies First Class, Ladies Second Class असं डब्यांचं विभाजन आहे. लोकल प्लॅटफॉर्म वर थांबली की, आधाश्या सारखं त्यात चढायच्या अगोदर 'दरवाज्यावरील लिहिलेला वर्ग तपासणं' हा सोपस्कार देखील करावा लागतो हे मुंबई बाहेरील नागरिकांना लवकर लक्षात येत नाही. १२ ते १५ डब्यांच्या लांबीची असणारी लांबसडक लोकल नागमोडी रुळावरून जाताना मात्र नागिणी सारखी दिमाखदारपणे निघून जाते.

मुंबईची लोकल हे फक्त प्रवासाचं साधन नाहीये. काही कष्टकऱ्यांच्या उत्पन्नाचं देखील साधन आहे. लोकलचा डबा चालता फिरता मॉल आहे ज्यामध्ये लहान विक्रेते केसातील पिना, चाप, रबरांपासून मोबाईलच्या हेडसेट पर्यंत सगळं विकत असतात. मोबाईलचे स्क्रीनगार्ड, बॅककव्हर, हातरुमाल, सौंदर्य प्रसाधनं, अत्तर, उदबत्ती-धूप, शीतपेये, गॉगल्स यांसारख्या असंख्य variety कमी किमतीत लोकल च्या डब्याखेरीज दुसरीकडे कुठे मिळत असतील यात शंकाच आहे. 
चाकरमान्याची रोजची लोकल, रोजचे ठराविक सहप्रवासी आणि घड्याळाच्या काट्याला बांधलेलं त्याचं नशीब, हे त्याच्या रोजच्या जीवनातला अविभाज्य घटक झाला आहे. रोजचे ठरलेले प्रवासी हे त्याच्या कुटुंबातील भाग बनून जातात. रोजच्या लोकलचा डबा घरातल्या एका खोलीसारखा बनून जातो. नवीन लोकलचा डबा सजवणं, छोट्या छोट्या गोष्टी लोकलच्या डब्यात साजऱ्या करणं, दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मी म्हणून लोकल ची पूजा करणं या सगळ्या गोष्टी मुंबईकर आणि लोकल यांच्यात असणाऱ्या चिरंतन प्रेमाचं प्रतीक आहेत.

मुंबईवर आजवर अनेक संकटं आली. अतिरेक्यांचे हल्ले झाले, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर रक्ताचे पाट वाहिले. तरीपण लोकल मात्र तिचं कर्तव्य पार पाडतच राहिली. पावसाळ्यात रस्त्यांवर अनेक वेळा पाणी साचलं आणि अश्या परिस्थितीत देखील मुंबईकरांना त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचण्याची जबाबदारी लोकल ने समर्थ पणे पेलली. स्टेशनचे प्लॅटफॉर्म पाण्याखाली गेले तरी त्याच दिमाखदारपणे प्लॅटफॉर्मच्या दुतर्फा असणाऱ्या प्रवाशांना अंघोळ घालत ती येत राहिली आणि पुढच्या स्टेशनकडे पळत राहिली. आजवर अस्मानी संकटं कोसळून देखील आपली सेवा न थांबवणारी लोकल सातत्याचं प्रतीक बनली आहे. पण कोरोनाच्या जागतिक संकटाने मात्र आज या लोकलची चाकं थांबली आहेत. सतत धावत असणाऱ्या या मुंबईच्या भाग्यलक्ष्मीला असं एके ठिकाणी थांबलेलं पाहून खरंच काळजात धस्स होतं. लोकलची चाकं आता पुन्हा रुळावर धावायला आतुर झालीयेत. लवकरात लवकर कोरोनाची स्थिती जाईल आणि पुन्हा मुंबई ची जीवनरेषा सुरळीत होईल. मुंबईकराचे कान आता पुन्हा आतुर झालेत लोकल येण्याची उद्घोषणा ऐकायला, डब्यात बसून 'अगला स्टेशन' ऐकायला, 'गाडीच्या पायदान आणि फलटावरील अंतराकडे लक्ष द्या' अशी प्रेमळ सूचना ऐकायला आणि लांबूनच 'मी येतीये' हे सांगणारा गगनभेदी हॉर्न ऐकायला!

-आदित्य मोरे

Comments

  1. खूप छान लिहिलं आहे आदित्य ..लिहीत रहा .. तुझ्या लिखाणासाठी शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment