स्त्री उदात्तीकरण

अतुल्य भारत. 
असा देश ज्याला हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. करोडो लोक, शेकडो भाषा, अनेक परंपरा आणि असंख्य वेगवेगळ्या मानसिकतेत विभागलेला अखंड देश. या देशाचं अखंडत्व आजही टिकून आहे कारण सर्व धर्म-जातीपलीकडे असणारी संस्कृती आणि शालीनता. इथं जन्मलेल्या प्रत्येक लहानग्याला या संस्कृतीचे बाळकडू विशेष प्रयत्न न करता आजूबाजूच्या गोष्टींकडे बघून मिळत असतं. आणि याच संस्कृती व शालीनतेमध्ये दर्शन घडतं स्री दाक्षिण्याचं. या देशाच्या गौरवशाली इतिहासात स्त्री दाक्षिण्याची बरीच उदाहरण होऊन गेल्याची नोंद आहे, म्हणजे प्रभू श्रीरामांचे एकपत्नीत्व, रावणाने सीतेचे राखलेले पावित्र्य, श्रीकृष्णाने केलेले द्रौपदीचे केलेले लज्जारक्षण, ५००० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीने अवलंबलेली मातृसत्ताक कुटुंबपद्धती, छत्रपती शिवरायांचा स्त्रियांबद्दलचा सन्मान, पेशवे माधवरावांचे रमाबाईंवरील शुद्ध प्रेम, स्वातंत्र्याच्या चळवळीतील स्त्रियांचा सहभाग आणि पाठिंबा, स्वातंत्रोत्तर काळात स्त्रियांच्या बाजूने उभा असणारा कायद्याचा चाबूक.. ही आणि अशी बरीच उदाहरणं.. जर कागदावर लिहायची झाली तर कागदाचे व्यापारी आणि शाईचे कारखानदार ७ पिढ्या बसून खातील. सांगायचा मुद्दा की स्त्री दाक्षिण्य हे संस्कार वर्ग लावून वेगळं शिकायची गरज आज पर्यंत कधी भासली नव्हती. परंतु द्वापरातून कलीने सूत्र हातात घेतली, आणि काळानुरूप तो रंग दाखवायला लागला तिथं सगळं बिनसलं. 

जिथं जिथं स्त्रीला माणूस म्हणून बघण्याऐवजी एक शरीर म्हणून बघितलं गेलं, तिथं तिथं या संस्काराची खांडोळी करून लख्तर वेशीवर टांगली गेली. श्रीकृष्णाची चेष्टा केली गेली, छत्रपती शिवरायांचे विचार मातीमोल केले गेले, सिंधू संस्कृतीच्या सभ्यतेला हरताळ फासला गेला, आणि 'तो' रावण म्हणायच्या लायकीचा देखील उरला नाही. स्त्री ची मानसिक, शारीरिक, भावनिक अवहेलना समाज उघडया डोळ्यांनी काहीही न करता बघू लागला. तिला कधीच त्याच्यावर आवाज चढवता आला नाही किंवा त्याच्याविरुद्ध आवाज उठवता आला नाही कारण काही पायांनी तिची जीभ तळव्याखाली दाबून ठेवली होती. कचरत आणि घाबरत जीवन व्यतीत करणं हा एकमेव पर्याय दिसायचा. मासिक पाळीच्या वेळीच्या पोटातील असह्य वेदना कमरेला पदर आवळून घेऊन दाबून टाकायची. पाठीवरचे वळ, जखमा गरम पाणी पडताच ठणकू लागायचे पण ती कुठे बोलायची नाही. त्याची रोजची असूरी वासना झेलण्यासाठीच लग्नाची किंमत मोजून तिला विकत आणलंय या समजुतीने स्वस्थ पडून राहायची. अंगावरचे भाजलेले डाग, गालावरचे वळ तिच्या तोंडून तिच्या वेदना कधीच वदवू शकले नाहीत. चुलीच्या धुरामुळे आलेल्या पाण्यात ती तिचे अश्रू बेमालूम लपवायची. परकर पोलक्यात खेळणाऱ्या त्या मुलीचं निरागस आणि निखळ हास्य लुगड्यातल्या पदराआड कधी लपून गेलं तिचं तिलाच कळलं नाही.

श्रीमद्भागवतगीता (अध्याय ४ श्लोक ७)-
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।


श्रीकृष्णाने अवतार घेतला. स्त्री उध्दारण आणि उन्नती साठी बऱ्याच समाजसुधारकांनी पुढाकार घेतला. तिचं दुःख, वेदना, असह्यपणा समजून घेणारं कुणीतरी आहे म्हणून तिलाही मानसिक आधार मिळाला. तिच्या शोक, वेदनेला निचरा होण्यासाठी वाट मिळाली. कायदा व शासन तिच्या पाठीमागे रक्षक म्हणून उभे राहिले. इतिहासात डोकावलं तर तिच्या कष्ट, मेहनतीवर कधीच तेवढ्या गांभीर्यानं बघितलं गेलं नाही. त्यामुळं तिचं स्वतःच कर्तृत्व म्हणून असं काहीच उरलं नव्हतं. पण आता मात्र तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्याची रेषा उमटली, आजपर्यंत फक्त भेदरलेल्या डोळ्यात भविष्याचे स्वप्न दिसू लागले, घरकाम करून करून फाटलेले हाथ अक्षरे गिरवू लागले, फक्त वेदनेचे हुंकार काढणारी वाणी आता इंग्रजी वाचू लागली, बोलू लागली, जगण्याची उमेद संपलेलं मन पुन्हा पल्लवित होऊ लागलं, सुंदर आणि सुसह्य जगण्याची कल्पना करू लागलं. ती काळोखातील भूतकाळ झटकून उठली आणि झगमगीत प्रकाशात तेजस्वी भविष्य निर्माण करू लागली. मोठी मोठी शासकीय पदं भूषवली, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा लौकिक वाढवला, हातात शस्त्रास्त्र घेऊन देशाचं रक्षण करू लागली, एखाद्या रुग्णासमोर देवाचा अवतार म्हणून उभी राहिली. क्रीडाविश्व, मनोरंजनसृष्टी, साहित्य ललित कला, संशोधन, राजकारण, समाजकारण यांसारख्या अनेक क्षेत्रांत आपला अश्वमेध यज्ञ चालूच ठेवला. जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रामाणिकपणा यांची पवित्र आहुती देऊन या यज्ञाच्या ज्वाला आकाशाला गवसणी घालू लागल्या.

काळ पुढे गेला. काही भागात तिची परिस्थिती म्हणावी तितकी चांगली अजूनही नव्हती. एखाद्याचा लौकिक वाढला की त्याच्या प्रगतीचा फायदा घेऊन आपली संधी साधून घेणारे त्याच्या आजूबाजूला येऊन चिकटतात याला इतिहास साक्ष आहे. श्रीकृष्णाने अवतार घेतला तिला या संकटातून तारून नेण्याचा मार्ग दाखवला आणि श्रीकृष्ण वैकुंठाला गेला. त्यानंतर मात्र अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या आणि स्वतःला समाजसुधारक म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला श्रीकृष्ण समजायला सुरुवात केली. आतापर्यंतच्या सगळ्या चळवळी, उठाव, आंदोलने स्त्री कल्याणासाठी, उन्नतीसाठी होत होत्या परंतु आता इथून पुढच्या चळवळी स्वघोषित सुधारकांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी होणार होत्या हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नव्हती. या समाजकारणाचे रूपांतर राजकारणात झाले. एखाद्या निर्दोष युवकाला अडकवून, त्याला धमकी देऊन त्याच्याकडून तोंडाला येईल त्या मागण्या पुऱ्या करून घ्यायला सुरुवात झाली.

आज या भारत देशात काही वेगळी परिस्थिती नाहीये. स्त्री उदात्तीकरणाचा खोटा आविर्भाव आणून देशाची शासन, प्रशासन, कायदा व्यवस्था मन मानेल तशी झुकवायची आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या. देशात कुठल्याही प्रकारचा वाद चालू नसताना, देश स्वस्थ असलेला काहींना खरंच बघवत नाही. शांत वातावरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, समानतेचा अधिकार यांसारख्या कायद्यानं दिलेल्या अधिकारांचा गैरफायदा करून घेऊन देशातील वातावरण गढूळ करायचं. हे असलं सगळं केल्यानं त्यांना कसला असूरी आनंद होत असेल कुणास ठाऊक? स्वतःच वातावरण गढूळ करायचं आणि समाजापुढे जाऊन स्वतःच 'वातावरण निवळण्यासाठी आपण किती प्रयत्नशील आहोत, माझ्यामुळेच परिस्थिती पूर्ववत कशी येईल' असे फाजील आत्मविश्वासाचे दाखले द्यायचे आणि स्वतःचा अमाप राजकीय फायदा करून घ्यायचा हे यांच्या रक्तातच भिनलय. या सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे 'स्त्री उदात्तीकरण' हा सगळ्या समाजाचा जिव्हाळ्याचा विषय बनलाय. त्यामुळे सगळा समाज (स्त्री वर्ग विशेषतः) या स्वघोषित सुधारकांच्या पाठीशी उभा असतो. समाजाला जाणीवही नसते की आपल्या सामर्थ्याचा वापर करून एखादा स्वतःचा फायदा करतोय.

'स्त्री उदात्तीकरण' हे बऱ्याच ठिकाणी अति प्रमाणात समाजात येऊ घातलंय. समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रसारमाध्यमे, चित्रपट, मालिका कारणीभूत ठरतात. मनोरंजन क्षेत्रात नव्याने येऊ घातलेल्या वेब सिरीज सुद्धा मागे नाहीत या बाबतीत. 'परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे' मान्य. पण कुठपर्यंत? काही सीमा, बंधन काही आहेत का? पाश्चात्य संस्कृतीचा एक भाग स्वीकारणे आणि संपूर्ण पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. She is young and she must drink, smoke, do drugs (ती तरुण आहे, तिने दारू प्यायलीच पाहिजे, धूम्रपान केलंच पाहिजे, नशिल्या पदार्थांचे सेवन केलंच पाहिजे).. She has freedom to maintain multiple relationships and she can have sex with anyone anytime and she must do that.(तिला अनेक जणांशी संबंध ठेवण्याचे, कुणाशीही, कधीही लैंगिक संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे आणि तिने हे केलंच पाहिजे). These things will make her modern, independent, capable girl (या सगळ्या गोष्टी तिला नवीन विचारांची, स्वतंत्र आणि योग्य मुलगी बनवतील.), तिने स्वातंत्र्याच्या नावाखाली कुठेही, कुणावरही, कसेही आरोप केले तरी ते चालतात. त्या आरोपांची सत्यता पडताळून न पाहता सगळा समाजवर्ग त्याला आरोपी ठरवून बदमाश, चारित्र्यहीन अश्या पदव्या बहाल करतो. स्त्री स्वातंत्र्य आणि उदात्तीकरण यांची व्याख्या काळानुरूप बदलत आहे. एकेकाळी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला सांगणारे 'स्त्री स्वातंत्र्य' मात्र आजकाल भारतीय संस्कृतीला फाटा देऊन मनाला येईल तसं व्यभिचारी आणि ताळतंत्र सोडून वागायला सांगतंय ही खरंच लांच्छनास्पद गोष्ट आहे.

स्त्री ही खूप पवित्र भावना आहे. तीच पावित्र्य या खोट्या स्त्री उदात्तिकरणाने हिरावून घेतलंय. एखाद्याला अडकवायचं असेल तर हे ब्रम्हास्त्र म्हणून वापरलं जातं. कायद्याच्या कचाट्यातून त्याला मात्र कसलीही सूट मिळत नाही. आजकाल तो तिला घाबरतो. या भीतीचा फायदा घेतला जातो, तोंडाला येईल ती किंमत मागितली जाते. मागण्या मान्य केल्या नाहीत तर कायद्याचा धाक दाखवला जातो. कित्येकांचे संसार उध्वस्त होतात, कित्येक देशोधडीला लागतात. 'आपला स्वार्थ साध्य झाला की आपण पुढे चालत राहायचं, पाठीमागे त्याचं काय होत असेल हे मागेवळून बघण्याची माणुसकी सुद्धा ठेऊ नका' हेच सांगत असेल उदात्तीकरण.

भारत देश, जिथं देशाला आईचा दर्जा दिला गेलाय, परस्त्रीला माता, भगिनी म्हणून बघायचे संस्कार ज्या मातीने दिले त्याच मातीवर स्त्रियांवर होणारे अत्याचार खरंच निंदनीय आणि वाईट आहेत. परंतु समाजापुढे प्रकाशझोतात न आलेले 'खोट्या उदात्तीकरणामुळे' झालेले अन्याय देखील अयोग्य आहेत. सगळीकडे हेच चित्र आहे असंही नाही. काही ठिकाणी अजून ती बेड्यांमध्ये जखडलेली आहे. पण तिने तिच्या अडचणींवर स्वतः मात केली पाहिजे. कारण तिच्या आजच्या अडचणींचा उपयोग सुधारक मात्र त्यांच्या राजकीय फायद्यासाठी करणार हे नक्की. जेष्ठ लेखक सलीम खान म्हणतात, 'आंसू आये तो खुद पोछ लेना, दूसरे आएंगे तो सौदा करेंगे'।
तिने आपला आवाज उठवावा, क्रांती घडवावी, इतरांपुढे आदर्श ठेवावा पण योग्य मार्गाने आणि चांगल्या हेतूने. तिने स्वतःला अबला समजू नये, जिजाऊ आईसाहेब, राणी लक्ष्मीबाई, डॉ. आनंदीबाई जोशी, ऍनी बेझंट, कल्पना चावला, मदर तेरेसा, प्रियलता वड्डेदार यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या भारतात स्त्रियांचा आदर होत राहणार आणि जे करत नाहीत त्यांना समाज आणि न्यायव्यवस्था शासन करणार.

जगत जननी भवतारिणी
मोहिनी तू नव दुर्गा
तू भवानी महाकाली
तू शिवानी मंगला

जय हिंद.

- आदित्य मोरे

Comments

  1. खूपच छान..आदित्य

    ReplyDelete
  2. Kharac faar sundar lihilay Aaditya.
    Faminism aani fake feminism madhil dusat Seema Rekha drushya karavnyas aani vait pravrutti jhatkun pragatee cacyogya marg pakadnyache aani khrya gender equality kade nenyasathi faarac Uttam.

    ReplyDelete

Post a Comment